जिल्हा परिषदेच्या शाळेतील मध्यान्न भोजनानंतर विद्यार्थ्याचा चक्‍कर येऊन मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुपारचे जेवण झाल्यानंतर एका विद्यार्थ्याला अचानक चक्कर येऊन उलटी झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. गौरव विनोद कस्तुरे असे या विद्यार्थ्यांचे नाव असून १३ वर्षीय गौरव बिरणवाडी येथील रहिवासी आहे. मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बिरणवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण विद्यार्थ्यांना दिले. इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या गौरवने देखील दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेत दिले जाणारे जेवण जेवले. त्यानंतर त्याला अचानक चक्कर येऊन उलट्या झाल्या. त्यानंतर त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गौरवच्या मृत्यूने खळबळ माजली आहे.

दरम्यान, ज्यावेळी गौरवने आहार घेतला होता त्यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पोषण आहार खाल्‍ला. त्यामुळे गौरवचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून समजले नाही. पण पोषण आहारामुळेच मृत्यू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार तुपे करीत आहेत.