हिंजवडीसह सहा गावांतील रस्ते, पाणी आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाइन

हिंजवडीसह माण भागातील सहा गावांतील पाणी, रस्ते आणि कचऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवा. त्यासाठी स्थानिक शेतकरी, मुळशी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच स्वच्छ या संस्थेशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढावा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिल्या.

हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन, ग्रामपंचायत पदाधिकारी, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमारडीए आणि मुळशी तालुका प्रशासनातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

हिंजवडीसह, माण, चांदे, नाडे, मारुंजी आणि म्हाळुंगी या सहा गावांना सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. तो सोडविण्यासाठी मुळशी प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी घेता येईल. किंवा वाकड येथील मांगीरबाबा पाणी पुरवठा योजना विकत घेता येईल, तसे नियोजन करावे, अशी सूचना सुप्रिया सुळे यांनी अधिकार्यांना दिली.

याबरोबरच हिंजवडी ते म्हाळुंगी, चांदे नांदे ते म्हाळुंगी, आणि वाकड येथील शिवाजी चौक या भागातील रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावीत. त्यासाठी भूसंपादन आवश्यक असल्येने स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढावा, त्यांना योग्य मोबदला मिळावा याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे तातडीने योग्य तो मार्ग काढून लवकरात लवकर काम सुरु करावे, अशा सुचना सुप्रिया सुळे यांनी केल्या.

या सहा गावांतील कचरा टाकण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध नसल्याने हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत येत आहे. तो सोडविण्यासाठी नव्या जिल्हाधिकार्यांशी चर्चा करावी. त्यासाठी येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी त्यांची वेळ घेऊन सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सुचनाही सुळे यांनी मांडली. येत्या गुरुवारी (26) ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसोबत असोसिएशनने बैठक घ्यावी, असेही सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत सुचविले. याशिवाय, वाहतूक सुधारणा, सिग्नल यंत्रणा, पीएमपीचे प्रश्न, सुरक्षा आदींबाबतही त्यांनी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मुळशीच्या सभापती कोमल साखरे, माजी सरपंच सागर साखरे यांच्यासह शंकर मांडेकर, सुनील चांदेरे, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी कर्नल चरणजीतसिंग भोगल, केदार परांजपे, ऋचा आंबेकर, अनिल पटवर्धन, उन्मेश भतीजा, रत्नपारखी, मृणाल शिवले, शंकर साळकर यांच्यासह काही सोसायट्यांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थितीत होते.

नगरसेवक विशाल तांबे करणार मदत

कचरा प्रश्नावर पुणे महापालिकचे राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी त्यांच्या प्रभागात उत्तम काम केले आहे. कचरा वर्गीकरण करून ओला कचऱ्यासाठी त्यांनी बायोगॅस प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी त्यांनी स्वच्छ या स्वयंसेवी संस्थेची मदत घेतली आहे. तो प्रकल्प हिंजवडी भागातही राबविता येईल का, याची पाहणी तांबे हे करणार आहेत. शिवाय सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही काही संस्था त्यांच्याकडे असून त्या आपण पुरवू, असे आश्वासन तांबे यांनी हिंजवडी वासीयांना या बैठकीत दिले.