केअर टेकरनेच दिपाली कोल्हटकर यांचा खून केल्याचे निष्पन्न

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर यांचा खून त्यांच्या केअर टेकरने केल्याची धक्कादायक माहिती अलंकार पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून केअर टेकरला ताब्यात घेण्यात आले आहे.

नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर (वय 70) हे पत्नी दिपाली आणि त्यांच्या मातोश्री आशा सहस्रबुद्धे यांच्यासह एरंडवणे भागातील गुळवणी महाराज पथ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहतात. दिलीप कोल्हटकर आजारपणामुळे गेल्या ३ वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. गुरुवारी  (९ फेब्रुवारी) सायंकाळी कोल्हटकर, त्यांची पत्नी दीपाली आणि सासू आशा हे तिघे घरी होते. त्यावेळी स्वयंपाकघरात मोठया प्रमाणावर धूर झाल्याने आशा यांनी पाहिले तेव्हा त्यांना स्वयंपाकघरात दिपाली संशयास्पदरित्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडलेल्या दिसल्या.

पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी स्वयंपाकघरातील निरांजन जमिनीवर पडले होते. स्वयंपाकघरात आग लागल्याने दीपाली यांचा होरपळून मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांना होता. त्यानंतर  ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दीपाली यांचा गळा दाबून तसेच त्यांच्या डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे ससूनच्या अहवालात नमूद करण्यात आले. दरम्यान, दिपाली यांचा गळा आवळून डोक्यात मारत पुरावा नष्ट करण्यासाठी  दीपाली यांना पेटवून खून करण्यात आल्याच्या शक्यतेच्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, कोल्हटकर यांच्याकडे त्यांचा केअरटेकर दररोज बारा तासासाठी येत असतो. मात्र गुुरुवारी तो एकतास आधीच तेथून गेला असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानेच दिपाली यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. अलंकार पोलीस पुढील तपास करीत आहेत.

महत्वाचे

या प्रकरणातील आरोपीचे नाव किसन मुंडे असे असून तो भुम उस्मानाबाद येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.