गृहराज्यमंत्र्यांकडून कौतुक ‘त्या’ जिगरबाज पोलिसांचं !

मुंबई : मुंबईच्या वरळी पोलीस स्थानकातील कॉन्सटेबल किरण काशिद आणि दीपक भोसले यांनी जीवाची पर्वा न करता गुरुवारी दोन चोरांचा पाठलाग करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दाखवल्यावर गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दोघांचे कौतुक केलं.

‘कर्तव्य बजावत असताना जीवाची पर्वा न करता चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलीस काँस्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसलेंचा अभिमान आहे, दोघांचेही मनापासून अभिनंदन!’ अशा शब्दात रणजीत पाटील यांनी दोन्ही कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे.

पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसले हे बीकेसी रोडवरुन जात असताना त्याचवेळी एक चोर मोबाईल चोरुन पळत होता. ही घटना पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोंसले यांच्यासमोरच घडली. त्यामुळे त्यांनी थेट या चोराचा पाठलाग सुरु केला. याचवेळी त्या चोराच्या मदतीला एक रिक्षाही आली.

त्यामुळे हा चोर एकटा नसून ही टोळी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी एकाच वेळी चोराचा आणि रिक्षाचा पाठलाग सुरु केला. कॉन्स्टेबल किरण काशिद यांनी धावत जाऊन मोबाईल चोराला पकडलं तर दीपक भोसले यांनी आपल्या गाडीच्या मदतीने रिक्षा चालकाला अडवून त्यालाही ताब्यात घेतलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.

हा संपूर्ण थरार एका सिनेमातल्या सीनपेक्षा कमी नव्हता. रिल लाईफमधले हिरो रियल लाईफमध्येही असतात हेच पोलीस कॉन्स्टेबल किरण काशिद आणि दीपक भोसले यांनी यानिमित्तानं दाखवून दिलं.