माढा तालुक्यात तलाठ्याला महिलेची मारहाण

माढाः पोलीसनामा आॅनलाईन
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात शासकीय अधिकारी कर्मचार्‍यांना मारहाण करण्याचे सत्र अद्यापही सुरूच आहे. तालुक्यातील उपळाई (बृ) गावातील जमावाने गुरुवारी महावितरणच्या दोन अधिकारी व कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आज (शुक्रवार) साडे दहा वाजता उपळवटे येथील तलाठी गौरक्षनाथ यशवंत ढाकणे यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अलका गायकवाड या प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या सदस्या असून या प्रकरणी अलका गायकवाड, शुभम गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड या तिघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तिघांवर अजामिनपात्र गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी माढा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष किसन दळवे यानी केली आहे.

तलाठी गौरक्षनाथ ढाकणे हे गावातील तलाठी सज्जात काम करीत असताना अलका गायकवाड या महिलेने तलाठी ढाकणे यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.अलका गायकवाड यांच्या पतीने दुसर्‍याला 11 गुंठे जमीन विकली होती. ऑनलाइनच्या नोंदी करण्याचे काम सध्या सुरु आहे. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करत असताना नोटीस बजावली जात नाही. अलका गायकवाड यांच्या पतीने विकलेल्या जागेची नोंद 7/12 उताऱ्यावर ऑनलाइन वर नोंद मंजूर झाली. आम्हाला नोटीस न बजावता नोंद का लावली, याच्या रागातून तलाठी ढाकणे यांना अलका गायकवाड बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत तालुक्यातील तलाठ्यांनी शुक्रवारी दुपारपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.