विराटविषयी लिहा; दहा गुण मिळवा

कोलकाता : वृत्तसंस्था
दहावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत असा प्रश्न एखादा प्रश्न आला की ज्याचे उत्तर पूर्वतयारी विनाच सहज लिहिता येईल. होय, असा प्रश्न पश्चिम बंगालमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना आला होता. ‘भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर १०० शब्दांत लिखाण करा!’ आहे की नाही, एकदम सोपा प्रश्न? क्रिकेटमध्ये फारसा रस नसलेल्या विद्यार्थ्याला देखील विराटवर किमान १०० शब्द लिहिता येतील; कारण विराटवर रोज काही न काही बघायला, वाचायला अन् ऐकायला मिळते आहे. तसेच या प्रश्नाला तसे संदर्भही देण्यात आले होते, ज्यावरून उत्तर लिहायचे होते.

बंगाली माध्यमाच्या विद्यार्थांच्या इंग्रजीच्या प्रश्चपत्रिकेतील हा प्रश्न सध्या कोलकात्यात चर्चेचा विषय आहे. हा प्रश्न पाहून सुखावलेला एक विद्यार्थी म्हणतो, ‘पुस्तकबाह्य प्रश्नांमध्ये विराट कोहलीवर लेखन करण्यास सांगण्यात आले होते. बहुतेक सर्वांना हा प्रश्न आवडला; कारण या प्रश्नासाठी पैकीच्या पैकी गुण मिळण्याची खात्री आम्हाला आहे. त्यामुळेच तर पेपर आटोपला तरी या प्रश्नाबाबतची आमची उत्सुकता कमी झाली नव्हती’. आम्हाला प्रश्नासह संदर्भ दिले नसते तरी चालले असते. आम्ही असेही विराटवर शंभरपेक्षा जास्त शब्दांत लिहू शकतो. अशी एखादी व्यक्ती दाखवा दुर्मिळच जिला विराट विषयी काही माहिती नाही.”

माजी क्रिकेटपटू आणि सध्या आमदार असणारे लक्ष्मीरतन शुक्ल म्हणाला की, ‘विराटबाबतचा प्रश्न देऊन बोर्डाने योग्य तेच केले आहे. खरेतर भारताच्या इतर खेळांतील यशस्वी खेळाडूंबाबतही प्रश्न यायला हवेत’. तर पश्चिम बंगालच्या दहावी बोर्डाचे अध्यक्ष कल्याणमय गांगुली यांनी सांगितले की, ‘विविध क्षेत्रांत भारताचे नाव उंचावलेल्या व्यक्तिमत्वांबाबत या आधीही प्रश्न आलेले आहेत. विराट हे यातील नवे नाव’.