सह्याद्रीचे मावळे ‘टांझानियात’ शिवजयंती साजरी करणार

पुणे : पोलिसनामा आॅनलाईन

पिंपरी चिंचवड उदयोगनगरीतील सह्याद्रीचे मावळे, अनिल दत्तात्रय वाघ (वय 33 वर्षे), क्षितीज अनिल भावसार (वय 27 वर्षे) आणि रवि मारुती जांभूळकर (वय 30 वर्षे) हे युवक 19 फेब्रुवारीला साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रथमच दक्षिण आफ्रिकेतील टांझानियात साजरी करणार आहेत. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशिल सुधीर दुधाणे, सुर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम होणार आहे. शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहिम आहे. यासाठी सोमवारी (दि. 12 फ्रेबुवारी) हे युवक मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला प्रयान करणार आहेत. हे मावळे शिवजयंतीच्या दिवशी तेथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम होणार आहे. या ऐतिहासिक क्षणांचे ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. ‘गिर्यारोहणासारख्या साहसी क्रिडा प्रकारात युवकांनी यावे यासाठी देश परदेशात अशा मोहिमांचे आयोजन आम्ही करतो. यासाठी सामाजिक संस्था, उद्योजक, कंपन्या व दानशूर व्यक्तींनी मदत करावी’. असे आवाहन सुशिल दुधाणे यांनी केले.

जगातील सात उंच शिखरांपैकी चौथ्याक्रमांकाचे शिखर किलीमांजरोसह माऊंट एव्हरेट (समुद्र सपाटीपासून उंची 8,848 मीटर), ॲकॉनकागुआ (6961 मीटर), देनाली (6194 मीटर), माऊंट इलब्रस (5642 मीटर), माऊंट ब्लान्स (4810 मीटर) ही सर्व शिखरे आगामी काळात सात मावळ्यांना बरोबर घेऊन पादाक्रांत करु, व तेथे छत्रपतींच्या पुतळ्याचा अभिषेक करुन अभिवादन करण्याचा मनोदय अनिल वाघ यांनी पिंपरी (पुणे), येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.