हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत करोलबागमधील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या २६ गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या आहे.
मिळालेल्‍या माहितीनुसार, आज पहाटे चारच्या सुमारास हॉटेलच्या वरच्या मजल्यावर आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहाटेच्यासमयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे अनेकांना प्राण वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामळे झाले आहेत.
या आगीतून २५ जणांची सुटका करण्यात आली असून घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरुन उड्या मारल्या. असे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल.
अर्पित पॅलेस पाचमजली हॉटेल आहे. हॉटेलमध्ये एकूण ४५ रुम असून त्‍यातील ४० रुम बुक होत्या. हॉटेलमध्ये आणखी काही लोक अडकल्‍याची भीती व्यक्‍त केली जात आहे.