बिल्डरकडून वृद्धाची १० लाखाची फसवणूक 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन- चांगला परतावा देतो असे सांगून फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून, बांधकाम व्यावसायिकांनी वृद्धाची10 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भोसरी येथे घडला.

या प्रकरणी ज्ञानेश्वर गंगाराम हुलावळे (66, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर दिगंबर ज्ञानदेव पाटील (रा. प्राधिकरण, निगडी), प्रसाद कृष्णा (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर आणि प्रसाद बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची चिखली येथे आराध्या डेव्हलपर्स ही बांधकाम साईट सुरू आहे. त्यामध्ये फ्लॅट घेण्यात गुंतवणूक केली तर भविष्यात फायदा होईल, असे आमिष दाखवून फिर्यादी ज्ञानेश्वर यांना फ्लॅट घेण्यास भाग पाडले. फ्लॅट घेण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी जानेवारी 2013 मध्ये 10 लाख रुपये एवढी रक्कम चेकद्वारे आरोपींना दिली. मात्र आरोपींनी सहा वर्षे उलटली तरी फ्लॅटचा ताबा अथवा पैसे काहीही दिले नाही. तपास भोसरी पोलीस करीत आहेत.