मोदींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी १००० हून अधिक झाडांची कत्तल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंगळवारी ओडिशात सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मोदींचा हा दौरा वादात अडकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरला जागा करण्यासाठी ओडिशात तब्बल १००० झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे यासाठी वन विभागाची कुठलिही परवानगी घेण्यात आली नव्हती. या घटनेनंतर पर्यावरणवादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींची सुरक्षा आणि हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी सुरक्षित जागा निर्माण करण्यासाठी तब्बल १ हजार झाडे कापण्यात आली आहेत. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेनं दिल आहे. याबाबतच्या वृत्ताला वन विभागानेही दुजोरा दिला आहे. तर, हेलिपॅडच्या निर्मित्ती आणि सुरक्षेसाठी या झाडांची कत्तल करण्यात आल्याचं रेल्वे विभागाने स्पष्ट केल आहे.

पंतप्रधान मोदींचा दौरा लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी ही जागा रिकामी असल्याचे सांगत येथे हॅलिपॅडची निर्मित्ती करण्यासाठी परवानगी दिली. विशेष म्हणजे रेल्वे विभागाने हेलिपडच्या निर्मित्तीसाठी जागा दिली होती, पण वन विभागाने येथील झाडे कापण्याची परवानगी दिली नव्हती. वन विभागाने जवळपास १००० ते १२०० झाडांची कत्तल करण्यात आल्याचे मान्य केलं आहे.

सन २०१६ मध्ये शहरी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रेल्वेच्या अधिकृत जागेतील २.२५ हेक्टर जागेत वृक्षांची लागवड करण्यात आली होती. या कत्तलीमुळे संतप्त पर्यावरणवादी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.