अभ्यासाच्या तणावातून बोर्डाच्या परिक्षेपूर्वीच दहावीच्या मुलाची आत्महत्या

माढा : पोलीसनामा ऑनलाईन – काही दिवसांवर दहावीची बोर्डाची लेखी परिक्षा आली असताना अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील सोमनाथ कवले याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी अभ्याचा ताण न घेता परिक्षा द्यावी. तणावातून कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अभ्यास अवघड जातोय या कारणाने बोर्ड परिक्षेपुर्वीच नैराश्यातुन सोमनाथ कवले याने आत्महत्या केली. सोमनाथवर घरच्यांनी अभ्यासाचा दबाव कधीच टाकला नाही. तरी देखील त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.
सोमनाथ याने अभ्यास अवघड जात असल्याचे सांगितले होते. मात्र, अभ्यासाच्या दडपणाखाली येऊन तो असे काही करेल वाटले नसल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. काही दिवसातच बोर्डाची लेखी परिक्षा सुरु होत असून विद्यार्थ्यानी तणावमुक्त परिक्षा द्यावी असे आवाहन आता शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

अभ्यासाच्या ताणतणावातुन शहरी भागातले विद्यार्थी डिप्रेशन मध्ये जात असल्याच्या घटना वारंवार घडत असताना आता याचे लोण ग्रामीण भागापर्यंत आले आहेत. वाढती स्पर्धा आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचा बोजा सर्वच विद्यार्थी सहन करतात असे नाही आणि यातुन कमी मार्क पडू लागले कि अभ्यास नकोसा होतो. असाच प्रकार माढ्यात घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.