सीआयएसएफ जवानांच्या १२ वाहनांची जाळपोळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – येथील नेहरूनगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या औद्योगिक सुरक्षा बल अर्थात सीआयएसएफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह शासकीय अशा सुमारे १० ते १२ वाहनांवर अज्ञात इसमाने ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केल्याचा प्रकार घडला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मित घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही जाळपोळ अंतर्गत वादातून झाल्याचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चलार्थ पत्र मुद्रणालयाच्या सीएनपी, आयएसपी प्रेसमध्ये असलेल्या औद्योगिक सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी राहात असलेल्या नेहरूनगर वसाहतीमध्ये पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने विविध इमारतींच्या पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रकार केला.

वाहने जाळण्याचा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी वाहने पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला, तसेच उपनगर पोलिसांना कळविले असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांच्यासह पोलीस पथकाने धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याबाबत सीआयएसएफचे हवालदार संजयकुमार नरहरी बनसोडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.