घर सांभाळणाऱ्या 13 वर्षांच्या बॉक्सरचा मैदानात मृत्यू

वृत्तसंस्था- अनेकदा खूपच लहान वयात काहींवर कुटुंबाची जबाबदारी पडते. शहाणा माणूस जेव्हा घर चालवत असतो तेव्हा त्यालादेखील घर चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशात एका लहान मुलावर जर कुटुंबाची जबाबदारी पडत असेल तर साहजिकच त्याला अनेक समस्येला तोंड द्यावे लागते. परंतु असंच अडचणींचा सामना करता करता कुण्या लहान मुलाला अचानक मृत्यू यावा तितकीच दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना आहे. असंच काहीसं एका अवघ्या तेरा वर्षांच्या मुलासोबत घडलं आहे.

कोवळ्या वयात घर चालवण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी बॉक्सिंग खेळून त्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. पण ही गोष्ट करत असताना अवघ्या तेराव्या वर्षात त्याला मृत्यूने गाठले. वय वर्ष 13. हे खेळण्याचे-बागडण्याचे वय. पण घरी अठरा विश्व दारीद्र्य असल्याने अगदी दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. दुखापतीमुळे खेळाडूंना काही काळ खेळापासून लांब राहावे लागते. दुखापती या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात असं म्हणणं काही वावगं ठरणारं नक्कीच नाही. काही खेळाडूंचा तर मैदानात झालेल्या दुखापतींमुळे मृत्यूही होतो. अशीच एक घटना घडली आहे. 13 वर्षांच्या बॉक्सरचा खेळताना झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अनुचा थासाको असं या 13 वर्षाच्या बॉक्सरचे नाव आहे. थायलंडमधील ही घटना आहे. थाय बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात मोडणारा हा खेळ आहे. . थाय बॉक्सिंग खेळत असताना थासाकोच्या डोक्याला फटका बसला. त्यानंतर त्याला ब्रेन हॅमरेज झाले आणि धक्कादायक बाब अशी की, पुढील दोन दिवसांतच चक्क त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या मृत्यूमुळे त्याच्या कुंटुंबावर खूप मोठा आघात झाला आहे. खूप मोठ्या मानसिक धक्क्याला त्यांना सामोरे जावे लागत आहे.