गोवंशीय जनावरांच्या कातडीचा 14 लाखांचा साठा जप्त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- गोवंशीय जनावरांची कत्तली करून त्यांची कातडी धनगरवाडी येथील गोडावूनमध्ये साठा करून ठेवली होती. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तब्बल 14 लाख रुपयांची कातडी व एक लाख रुपयांची लहान-मोठी हाडे जप्त केली आहेत. शहरालगत मोठ्या प्रमाणावर जनावरांची कातडी सापडल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अंजुम इब्राहिम तांबटकर (रा. घास गल्ली, नगर), बाबू सय्यद (रा. जेऊर, ता. नगर), अनिस (रा. नगर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनगरवाडी शिवारातील गुलशन खडी क्रेशर जवळील गोडावूनमध्ये बेकायदेशीर रित्या गोवंशीय जनावरांच्या कत्तली करून त्यांची कातडी विक्री करण्यासाठी साठा करून ठेवत आहेत, अशी खात्रीशीर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्या नेतृत्वाखाली एपीआय चव्हाण, पोलीस कर्मचारी प्रवीण खंडागळे, परशुराम नाकाडे, मच्छिंद्र पांढरकर, नितीन उगलमुगले आदींसह जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुंबारे  यांच्यासह  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा सदर छापा टाकला. या छाप्यात वंशीय जनावरांची 13 लाख 76 हजार रुपयांची कातडी, एक लाख रुपयांचे 1 टन वजनाची लहान-मोठी हाडे असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या कातडीचा साठा सापडल्याने मोठ्या प्रमाणावर कत्तली होत असल्याचा संशय आहे. एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोवंशीय जनावरांची कत्तल, कत्तलीसाठी वाहतूक, कातडीची तस्करी कोणी करीत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केले आहे.