ठाण्यात पुन्हा जळीतकांड : एकाच वेळी १८ दुचाकींची केली राख

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे शहरात दुचाकी जाळण्याचे सत्र अजूनही सुरुच आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास पाचपाखाडी भागातील हनुमान सोसायटी परिसरात १८ दुचाकी  जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे ठाण्यात सध्या स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. काही दिवसांपूर्वी याच भागात अशी घटना घडली होती.

ही घटना रात्री अडीच वाजता घडली आहे. गाड्यांनी पेट घेताच स्थानिक सावध झाले आणि आगीवर लगेच नियंत्रण मिळवण्यात यश आले. यात मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी ही गाड्या पेटवून देण्याच्या अशा घटना घडल्या आहेत. ६ डिसेंबरला पाचपाखाडी भागातच पहाटेच्या सुमारास ९ दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. गाढ झोपेत असलेल्यांच्या घराबाहेर त्यांच्या गाड्या धगधगत होत्या.

तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला गाड्या जळताना दिसल्या आणि त्यानंतर त्याने तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. मात्र तोवर ९ गाड्या आगीच्या विळख्यात जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत जळणाऱ्या गाड्यांशेजारच्या गाड्या वेळेत बाजूला हटवल्या. याप्रकरणी अज्ञातांविरोधात नौपाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

आताही तसाच प्रकार घडला आहे. कोणीतरी माथेफिरु सुडाच्या भावनेने हे प्रकार करत असावा. एकाच परिसरात वारंवार गाड्या जाळण्याच्या प्रकारामुळे तो हे सगळे करत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.