माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी २ जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अपहरण झालेले रिपब्लीकन बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह लवासा रस्त्यावर मिळाला. त्यांचे अपहरण करुन निर्घृणपणे खून करण्यात आला असून याप्रकरणात पोलिसांनी दोन जणांना तेलंगणा येथून ताब्यात घेतले आहे. शिरसाट यांचा खून करण्यात आल्याने सर्वच स्तरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्तार आली आणि फारुख खान या दोघांना विनायक शिरसाट यांच्या खून प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी त्यांचाच मित्र वर्मा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा – पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या 

विनायक शिरसाट यांना धमक्या आल्या होत्या. विनायक शिरसाट हे रिपब्लिकन कामगार सेनेचे शहर अध्यक्ष आहेत. तसेच ते माहिती अधिकार कार्यकर्ते होते. त्यांनी शिवणे, उत्तमनगर, नऱ्हे, आंबेगाव, जांभूळवाडी येथील अनेक अनधिकृत बांधकामांबाबत पुणे महानगर पालिका व पीएमआरडीएकडे तक्रारी अर्ज केले होते. त्यांच्या अर्जावरून आतापर्यंत ७२ प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान ३० जानेवारी रोजी त्यांचे अपहरण करण्यात आले होते.

विनायक यांचे वडील सुधाकर शिरसाट यांना विनायक यांच्याच चालकाने फोन करून पंधरा लाख रुपये मागितले होते. त्याला त्यांनी सविस्तर विचारल्यावर चालकाला विनायक यांनी फोन करून वडीलांकडून पंधरा लाख रुपये घेऊन येण्याचे सांगितले. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु फोन बंद होता. त्यानंतर त्यांच्या जवळच्या एका मित्रालाही त्यांनी फोन केला परंतु तोही बंद होता. तर त्यांची कार जांभूळवाडी येथे एका बांधकाम साईटसमोर लॉक करून पार्क केलेल्या अवस्थेत मिळाली.

३१ जानेवारी रोजी त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ते बेपत्ता असल्याची तक्रार केली होती, मात्र प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी ५ फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर यासंदर्भात त्यांनी वारंवार पोलिसांकडे पाठपुरावा केला. परंतु पोलिसांकडून केवळ आमच्या पद्धतीने तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात होते. तर मंगळवारी त्यांचा निर्घृणपणे खून करून मृतदेह अपहरणकर्त्यांनी लवासा रोडवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या हत्येचा रिपब्लीकन मातंग सेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे.