विवाहितेवर सामुहिक अत्याचार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – घरी सोडतो असे सांगून आपल्या गाडीत घेऊन भर दिवसा गाडीतच विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याबद्दल दोघांना जिल्हा सत्र न्यायायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश टी. एम. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

गणेश देशमुख व राकेश बेलोसे अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना सुधागड तालुक्यातील पेडली गावाच्या हद्दीत १५ मार्च २०१५ रोजी घडली होती.  पिडित महिला १५ मार्च २०१५ रोजी औषधोपचाराकरीता पेडली या गावी गेली होती. दवाखान्यातून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या वाघोशी या गावी घरी परत येत होती. त्यावेळी यातील आरोपी गणेश देशमुख व राकेश बेलोसे यांनी आपली गाडी थांबवून ही महिला एकटी आहे, हे पाहून तिला आम्ही वाघोशी येथे जात आहे, असा बहाणा करून तिला आपल्या गाडीत बसवून घेतले. चालत्या गाडीतच दोघा आरोपींनी बलात्कार केला. त्यानंतर दमदाटी करून, धमकावून पीडित महिलेस घुरावले फाटा येथे रस्त्यातच सोडून दोघेही आरोपी फरार झाले होते.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी माणगाव सत्र न्यायालयाचे सत्र न्या. टी. एम. जहागीरदार यांच्या न्यायालयात झाली. सहा. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले.

‘या’ लढाईत आता अण्णांची उडी ; ३० जानेवारीपासून आंदोलनावर ठाम