पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात आग; २०० झोपड्या जळून खाक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी नगर येथील पाटील इस्टेट परिसरात आज दुपारी लागलेल्या आगीत जवळजवळ २०० पेक्षा जास्त झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. दीडच्या सुमारास लागलेली आग चारच्या सुमारास आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३० ते ३५ गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आग सध्या आटोक्यात आली असून चिंचोळ्या रस्त्यांमुळे आणि बघ्यांच्या गर्दीमुळे गाड्यांना घटनस्थळापर्य़ंत पोहचण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली नंबर ३ मधील एका झोपडपट्टीला दुपारी एक वाजून १० मिनिटांनी आग लागली. या आगीची खबर मिळताच सुरुवातीला अग्निशामक दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. मात्र, आग मोठ्या प्रमाणत असल्याने आणि सिलेंडरचे स्फोट होऊन आग पसरत असल्याने अग्निशमन दलाच्या आणखी गाड्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात धूराचे मोठ मोठे लोट उठताना दिसत आहेत. नदी काठाला लागून असलेल्या या गल्लीपर्यंत पोहचण्यात अग्निशामक दलाला मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. आग विझवण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, खडकी कॅन्टॉनमेंटमधील अग्निशन दलाच्या गाड्यांची मदत घेण्यात आली आहे.

या आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशामन दलाच्या वाहनांना जागा मिळावी, यासाठी परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे १५ कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गर्दी रोखण्याचे काम करीत आहेत. तसेच आगीमुळं पिंपरीकडून पुण्याकडे येणारा खडकीच्या पुढचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं या रस्त्यावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाकडेवाडी पुलाखालील रस्ता आणि संगमवाडीकडे जाणारा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सोमवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पाटील इस्टेट झोपडपट्टीमधील गल्ली नंबर ५ मधील एका झोपडपट्टीला आग लागली होती. गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाची गाडी आत जाऊ शकत नव्हती. आजही हीच परिस्थिती उद्भवली असून बघ्याच्या गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना पुढे जाण्यासाठी जागा मिळणे अवघड होत आहे.