अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणारा तरुण पोलीसांच्या जाळ्यात 

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन – पनवेलमधील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विकेश विलास चव्हाण (२९) असे या तरुणाचे नाव असून पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिन्याभरापूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ११ वर्षांच्या मुलीला एका तरुणाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याची तक्रार दाखल झाली होती. यानंतर पुन्हा १० वर्षांच्या मुलीला एका तरुणाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याची तक्रार दाखल झाली. ११ फेब्रुवारी रोजी ही दुसरी तक्रार समोर आली. एकाच महिन्यात पनवेल पोलीस ठाण्यातच दाखल झालेल्या दुसऱ्या तक्रारीनंतर मात्र पोलिसांच्या हालचालींना वेग आला.
यानंतर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. तपासाला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमधून आरोपीची ओळख पटण्यास मदत झाली. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी खबरीची मदत घेत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपीने घातलेल्या कपड्यांमुळे त्याची ओळख पटण्यास मदत झाली. दोन्ही गुन्ह्यांच्यावेळी आरोपीने एकच कपडे घातले होते. त्यामुळे त्याची ओळख पटली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये अनेक पाॅर्न व्हिडीओ असल्याचे आढळून आले.