दरोडा टाकण्यापूर्वीच ३ सराईत गुन्हेगार पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकण्यापूर्वीच तीन सराईत गुन्हेगारांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.१४) रात्री दोनच्या सुमारास नागझरी नाला येथे करण्यात आली. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शुभम महेंद्र सोनवणे (वय ३० रा. शिवाजीनगर), मंगेश ऊर्फ भज्या संजय पवार (रा. कोंढवा, कुमार ऊर्फ कुम्या बाळकृष्ण खुडे (वय – २३ रा. वाकडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल गवळी हे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलीस नाईक भांदुर्गे, शिंदे यांनी तीन सराईत गुन्हेगार ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तर त्यांच्या इतर साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. मंगेश उर्फ संजय पवार याच्यांवर फरासखाना, कोंढवा, दत्तवाडी पोलीस ठाण्यात १० गंभीर गुन्हे दाखल असून त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर कुमार उर्फ कुम्या खुडे याच्यावर चार तर शुभम सोनवणे याचेवर दोन गुन्हे दाखल आहेत.