बोगस गुन्ह्यात अडकविण्यासाठी कागदपत्रात फेरबदल ; सहायक पोलीस निरीक्षकासह ४ पोलीस निलंबित

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी जाणिवपूर्वक कागदपत्रात फेरबदल करुन दाखले बनविल्याच्या कारणावरून करण्यात आलेल्या तपासात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्यासह ४ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बोगस गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी जाणिवपूर्वक कागदपत्रात फेरबदल करुन दाखले बनविल्याचा आरोप करुन न्याय मिळविण्यासाठी दिगंबर आगवणे यांनी प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास सुरू केले होते.

आगवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, त्यांच्यावर पुणे येथे ३ नोव्हेंबर रोजी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात रिव्हॉल्व्हरचा वापर केल्याचा उल्लेख होता. आगवणे यांनी रिव्हॉल्व्हर पोलीस स्टेशनला केव्हा जमा केले होते व ते मी पुन्हा केव्हा परत नेले याच्या चौकशीचा अर्ज दिला होता. त्याअनुषंगाने जावक क्रमांक ४०२०/२०१८ ने रिव्हॉल्व्हर परवाना क्रमांक ४६३ हे १८ सप्टेंबर २०१७ ला जमा करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी रिव्हॉल्व्हर देण्यात आले असा दाखला दिला.

याबाबत आगवणे यांनी विचारणा केली असता रिव्हॉल्व्हर २१ फेब्रुवारी रोजी न नेता १९ एप्रिल २०१८ रोजी नेले असून आपण चुकीचा दाखला दिला आहे, असे सांगण्यात आले. आगवणे यांचे रिव्हॉल्व्हर रिनिव्हल नसल्याने ते एप्रिलमध्ये रिनिव्हल झाले आहे. त्यामुळे ते फेब्रुवारीत नेले नसल्याचे आगवणे यांनी सांगितले. परंतु पोलीस अधिकारी शिंदे यांनी तुम्हाला जे काय म्हणायचे आहे ते कोर्टात जा, असे सांगून आगवणे यांना बाहेर जाण्यास सांगितले.

आगवणे हे १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत परदेशात होते, भारतात नव्हते. आगवणे यांनी रजिस्टरची पाहणी केली असता त्यात खाडाखोड केल्याचे व सही बनावट असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनच्यावतीने पुन्हा १९ एप्रिल २०१८ रोजी रिव्हॉल्व्हर देण्यात आल्याचा दाखला दिला गेला होता. आगवणे हे उपोषणास बसल्या नंतर या बनावट दाखला तक्रारीबाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. याबाबत तपासी अधिकारी यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अभिलेखाची तपासणी केली व यानंतर आगवणे तसेच जबाबदार पोलीस कर्मचारी यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

याप्रकरणी दोषी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एस. शिंदे, पोलीस हवालदार एन. एस. मते. पोलीस हवालदार आर. बी. लिम्हण, पोलीस नाईक आर. डी. देवकर, पोलीस नाईक एस. पी. भोसले यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांनी दिली आहे.