धक्कादायक ! तब्बल 68 लाख युजर्सचे फेसबुकवरील फोटो लीक

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – फेसबुकवरील डेटा लीक होण्याच्या अनेक घटना आपण यापूर्वी ऐकल्या किंवा वाचल्या असतीलच. कारण गेल्या काही दिवसांपासून सतत फेसबुकवरील डेटा लीक होत आहे. असाच डेटा लीक झाल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. आता पुन्हा एकदा फेसबुकवरील 68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो लीक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फेसबुकने युजर्सची माफी मागितली आहे.

आपण अनेकदा एखाद्या अॅप किंवा साईटवर फेसबुक आयडीवरुन लॉग इन करतो, तेव्हा ते अॅप आपल्याकडे फेसबुकवरील फोटोंना अॅक्सेस देण्याची परवानगी मागते. तेव्हा आपण अलाऊ करतो (परवानगी देतो), तेव्हा आपण प्रायव्हेट केलेले फोटो त्या अॅपसोबत शेअर होत नाहीत. परंतु फेसबुकवरील एका ‘बग’मुळे तब्बल 68 लाख लोकांचे गोपनीय आणि वैयक्तिक फोटो लीक झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान  फेसबुकने युजर्सची माफी मागितली आहे. मुख्य म्हणजे त्याबद्दल आतापर्यंत दोन वेळा फेसबुकने युजर्सची माफीदेखील मागितली असल्याचं दिसत आहे.

13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरदरम्यान फेसबुकच्या डेटाबेसमध्ये एक बग आला. त्यामुळे फेसबुक युजर्सचे सर्व फोटो विविध अॅपसोबत शेअर झाले. जे फोटो प्रायव्हेट केले होते, तेदेखील फोटो शेअर झाले. त्यामुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर आता कोणाचेही वैयक्तिक फोटो कोणत्याही अॅपवर सार्वजनिक झाले तर त्या युजरला लगेच त्याचे नोटिफीकेशन त्याच्या फेसबुकवर मिळेल.