शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, ७ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

यवत (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट लागले. शिवजयंतीनिमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गाडीचे चाक एका सात वर्षाच्या मुलाच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सार्थक गणेश गायकवाड (वय-७) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.

ही दुर्दैवी घटना दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे घडली. दौंड तालुक्यातील बोरीऐंदी येथे मंगळवारी शिवजयंतीची मिरवणुक काढण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीत बंदी असताना देखील डीजे लावण्यात आला होता. डिजेच्या तालावर अनेकजण बेधुंदपणे नाचत होते. त्यामध्ये सार्थकसह काही लहान मुले देखील नाचत होती. मुलांसोबत नाचत असताना सार्थकला धक्का लागल्याने तो डीडेच्या गाडीच्या बाजूच्या चाकाखाली आला. यामध्ये गीडीचे चाक सार्थकच्या अंगावून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.

सार्थक निपचीत पडल्याचे पाहून त्याला तात्काळ लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याबाबत सार्थक याचे चुलते सतिश गायकवाड यांनी यवत पोलिस स्‍टेशनमध्ये या घटनेची फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार शशिकांत वाघ या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.