बक्कळ ‘माया’ मिळविलेल्या ‘त्या’ रेल्वे अधिकाऱ्याला ७ वर्ष सक्त मजुरी ; १० लाखाचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बक्कळ ‘माया’ (असंपदा) मिळविलेल्या रेल्वे अधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने ७ वर्ष सक्त मजुरी आणि १० लाख रुपये दंड ठोठावला.

वीरसिंग कुमारसिंग चौधरी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सीबीआयने २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता. चौधरीने असंपदा मिळविल्याची माहिती सीबीआयला कळाल्यानंतर तपास सुरू झाला होता. आरोपीने ज्ञात उत्पन्नापेक्षा साडेसातशे टक्के अधिक पैसा जमविल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. आरोपीने त्याची पत्नी, मुलगा, मेहुणी, सासूच्या नावावर विविध बँकखात्यात ठेवी ठेवल्या होत्या. आरोपी हा रेल्वेच्या दौंड येथील रेल्वे कंझ्युमर डिपार्टमेंट मध्ये चीफ लोको इन्स्पेक्टर या पदावर काम करीत असताना त्याने २०११ ते २०१३ याकालावधीत ही असंपदा मिळविली.

डिझेल घोटाळ्याप्रकरणी प्रलंबित खटल्यात आरोपीचा समावेश आहे.
या गुन्ह्याचा तपास सीबीआयच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी केला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी काम पाहिले.