७० कावळे ४० कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर सफाईसाठी गेलेल्या कामगारांना सुमारे ७० कावळे व ४० कुत्रे मृतावस्थेत आढळून आले. पक्षी व प्राण्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विषबाधेतून किंवा थंडीमुळे हा प्रकार झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आठवडे बाजारानंतर सकाळी देवळालीचे कामगार स्वच्छता करण्यासाठी बाजारतळावर गेले होते. त्यांना तडफडणारे व मृत्यू झालेले कावळे आढळून आले. तसेच शहरातील विविध गल्ल्यांमध्ये अनेक कुत्र्यांचे मृतदेह आढळल्याने नगरपालिका कामगारांना चांगलीच धावपळ करावी लागली. कावळे आणि कुत्रे यांच्या मृतदेहांची दुर्गंधी सुरू झाल्याने स्वच्छता कर्मचार्‍यांना त्याचा त्रास जाणवू लागला होता.

याबाबतची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त भांगरे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन पं.स. अनिल कुलकर्णी यांना मिळाली असता, त्यांनी तातडीने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिवाळी प्रवरात पाठविले. या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले आहे. प्राथमिक अंदाज पाहता हा प्रकार विषबाधेतून झाला असावा, असे वाटत असले तरी याबाबत पुणे येथे तपासणी केली जाणार असल्याचे समजते.

पुढील तपास डॉ.टिटमे यांचे मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉ.अभंग हे करीत आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून तातडीने अहवाल मागविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.

यावेळी देवळाली प्रवराचे उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, कार्यालयीन अधीक्षक बी. डी.वाळके, आरोग्य प्रमुख दत्तात्रय कदम, सुरेश वाळुंज, बाळासाहेब चव्हाण, समाजसेवक संदीप कदम, पत्रकार चेतन कदम आदींसह नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.