‘या’ शहरात ९ लाख मतदार बोगस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई शहर व उपनगरात एकाच व्यक्तीच्या छायाचित्रावर वेगवेगळ्या नाव-पत्त्यांनी ११ ते १३ मतदार ओळखपत्र अशा रीतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १५ ते २० हजार बोगस मतदारांची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण नऊ लाख बोगस मतदार आढळून आले असून ही नावे वगळावीत, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.
नितीन शिंगाटे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत मतदार याद्यांची छाननी केली असता एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या नावाने ११ ते १३ मतदान ओळखपत्रे आढळून आली. छायाचित्र एकच पण वेगवेगळ्या नावांचा वापर करून वेगवेगळ्या पत्त्यांवर हे मतदार दाखवण्यात आले आहेत असा त्यांचा दावा आहे.
मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये १५ ते २० हजार आणि लोकसभा क्षेत्रामध्ये एक ते दीड लाख बोगस मतदारांची नोंद झाली आहे असा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मतदार यादीचा मसुदा जाहीर करणार आहे. त्याआधी सर्व बोगस मतदार ओळखपत्र या मतदार यादीतून वगळली पाहिजेत अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.