९६ वर्षीय महिलेने मिळवले ९८ टक्के गुण

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – असं म्हणतात की, माणूस मरेपर्यंत शिकत असतो म्हणून तो नेहमीच विद्यार्थी असतो असेही म्हटले जाते. इतकंच नाही तर शिक्षणाला वयही नसतं, असावी लागते ते केवळ इच्छा. असंच काहीसं एका महिलेने सिद्ध केलं आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी या आजींनी ९८ टक्के गुण मिळवले आहेत. केरळमधील या आजी असून कारथियानीअम्मा कृष्णापिल्ला असं त्यांचं नावआहे. कारथियानीअम्मा केरळच्या साक्षरता आयोगाकडून चौथ्या इयत्तेसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परिक्षेत सर्वाधिक ९८ टक्के गुण मिळवून राज्यातून पहिली आली आहे. उद्या एक नोव्हेंबर रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन मेरीट प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करणार आहेत.
ती घराजवळच्या काही मंदिरांमध्ये साफसफाईचे काम करायची. केरळमध्ये चौथी, सातवी, दहावी, अकरावी आणि बाराव्या इयत्तेसाठी एक समान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४३,३३० विद्यार्थी बसले होते. त्यात ४२,९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अलाप्पूझा जिल्ह्यातील मट्टम गावात रहाणारी कारथियानीअम्मा कधीही शाळेत गेली नाही. कारथियानीअम्मा चौथ्या इयत्तेच्या परीक्षेमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळवून राज्यात पहिल्या आल्या असे साक्षरता मिशन यंत्रणेच्या संचालक पीएस श्रीलथा यांनी सांगितले.
‘यावर्षी २६ जानेवारी २०१८ रोजी केरळच्या साक्षरता आयोगाने राज्यात १०० टक्के साक्षरता आणण्यासाठी ‘अक्षरालक्षम’ प्रकल्पाची सुरुवात केली. मला चांगले गुण मिळाल्यामुळे मी आनंदी आहे. आता मला लिहिता, वाचता येते तसेच अंकही मोजता येतात’ असे कारथियानीअम्माने सांगितले. ‘आमच्या काळात मुली शाळेत जात नव्हत्या. जेव्हा माझी ५१ वर्षांची धाकटी मुलगी २०१६ साली दहावीच्या पात्रता परिक्षेत पास झाली तेव्हा मी ही परीक्षा आव्हान म्हणून स्वीकारली’ असे कारथियानीअम्माने सांगितले.

कारथियानीअम्माची १२ वर्षांची नात अपर्णा आणि ९ वर्षांची नात अंजना या दोघींनी तिला शिक्षणासाठी मदत केली. आम्हाला सर्वांन कारथियानीअम्माचा अभिमान आहे. ती स्वेच्छेने वर्गामध्ये यायची असे श्रीलथा यांनी सांगितले.