३ हजार रुपयाची लाच घेताना उप अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – खोदकाम केलेल्या विहरीच्या कामाच्या पुर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना जिल्हा परिषदमधील पाणी पुरवठा विभागाच्या उप अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) जालना येथील महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयात करण्यात आली.

विजयेंद्र पुरुषोत्तम फुलंब्रीकर (वय-५० रा. विश्वकर्मा सोसायटी, औरंगाबाद) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या उप अभियांत्याचे नाव आहे. याप्रकरणी शेतकऱ्याने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.विजयेंद्र फुलंब्रीकर हे परतुर येथील उप विभागात उप अभियंता म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर खोदली आहे. विहरीचे काम पुर्ण झाल्याने शासनाकडून अनुदान मिळाले होते.

तक्रारदार यांनी या विहरीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी गावच्या तलाठ्याकडे अर्ज केला होता. तलाठ्याने विहरीच्या खोद काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. तक्रारदाराने कादपत्रांची पुर्तता करुन परतुर उपभागातील उप अभियंता फुलंब्रीकर यांची भेट घेऊन प्रमाणपत्रावर सही करण्याची विनंती केली. त्यावेळी त्याने प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली.

तसेच गावातील इतर दोघांच्या प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी प्रत्येकी दोन हजार असे एकूण सहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता फुलंब्रीकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने महाराष्ट्र जिवन प्राधिकरण कार्यालयात सापळा रचून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

आरोपी उप अभियंता विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधिक्षक जिरगे, पोलीस उप अधिक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आ.वि. काशिद, पोलीस निरीक्षक व्ही.एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदिप दौडे, महेंद्र सोनवणे, गंभिर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रविण खंदारे यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.