नाशिकच्या पोलीस अकादमीवर ड्रोनच्या संशयास्पद घिरट्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमीवर ड्रोनने संशयास्पदरीत्या घिरट्या घातल्याने खळबळ उडाली होती. काही वर्षांपूर्वी शहरात एटीएसच्या हाती लागलेल्या अतिरेकी बिलाल शेख यानेही एमपीएची रेकी केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या भागातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. शहर पोलिसांच्या वतीने ड्रोनधारकांचा शोध घेतला जात असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात ड्रोनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक अनिल बागूल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील महत्त्वाचे ठिकाण असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस अकादमी भागात खात्यांतर्गत उपनिरीक्षकांच्या परीक्षेची तयारी सुरू असतानाच सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी ड्रोनने घिरट्या घातल्या आणि महात्मानगरच्या दिशेने निघून गेले. या घटनेची गंभीर दखल घेत, शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी महात्मानगरसह सर्वच परिसर पिंजून काढला; मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतेही धागेदोरे हाती लागले नाहीत. पोलिसांनी शहरात ज्या व्यक्ती ड्रोनचा वापर करतात तसेच शौकिन फोटोग्राफर्सकडे चौकशी करूनही, पोलिसांच्या हाती काही लागले नाही. सुरू झालेल्या या तपासात अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा खोडसाळपणा होता की, पूर्वनियोजित कट, हे समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान, यापूर्वी दहशतवादी संघटनांकडून झालेल्या रेकीच्या पाश्र्वभूमीवर एमपीएची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. येथील संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यात आली असून, शीघ्र कृती दल, एसआरपी अशा १०० सुरक्षारक्षकांची फौज येथे तैनात असते. या घटनेने अवकाश धोका हा पहिल्यांदाच समोर आला असून, सुरक्षेशी संबंधित सर्वांनाच याबाबत अलर्ट करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एमपीए प्रशासनानेही याबाबतचा अहवाल शहर पोलिसांना दिला असून, या घटनेची माहिती गृह मंत्रालयाने मागविली असल्याचे समजते.