आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

 पंढरपूर : पोलिसनामा ऑनलाईन 

माढा येथील जगदंबा सूत गिरणी जमीन विक्री प्रकरणी माजी खासदार संदिपान थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी केली. यामध्ये बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या नावाचाही समावेश आहे.

या तिघांवर माढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम यांनी माढा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा माजी खासदार संदिपान थोरात, आमदार बबन शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्यावर भा.दं.वी. कलम ४०९, ४२०, ४६४, ४६५ आणि ३४ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.