शाळेत त्रास देणाऱ्या मुलाचे हात पाय बांधण्याची अघोरी शिक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शाळेत त्रास देणाऱ्या मुलाला शिक्षक व मुख्याध्यापक त्याच्या वर्तनात सुधारणा होण्सायासाठी लहान मोठी शिक्षा करतात. परंतु कोंढव्यातील मनसुखभाई कोठारी नॅशनल स्कूलमध्ये प्रिन्सिपल व महिला क्लास टिचरने चक्क हात सुतळीने बांधून ठेवण्याची अघोरी शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासोबतच याचा जाब विचारणाऱ्या शाळेतील शिक्षकाला काही कारण न देता नोकरीवरून काढून टाकले. त्यानंतर संबंधित शिक्षकाने महिला व बालकल्याण मंत्रालयाला मुलाचे फोटो व संबंधित माहिती मेल केला. त्यानंतर मंत्रालयाच्या आदेशाने चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकऱणी शाळेच्या प्रिन्सीपल प्रज्ञा गोखले व क्लास टिचरल हबीबा यांच्याविरोधात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम २००९ च्या कलमांनुसार व जे. जे. अक्टनसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत सातव (२८, सहकारनगर) यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत सातव हे कोंढव्यातील मनसुखभाई कोठारी शाळेत कराटे शिक्षक म्हणून काम करत होते. १ नोव्हेंबर २०१८ रोजी ते शाळेत असताना दुसरीच्या वर्गातील मुलांचा खेळाचा तास सकाळी पावणेनऊच्या सुमारास होता. त्यावेळी मुलं शाळेच्या मैदानात आली. त्यात एका मुलाचे हात सुतळीने बांधलेले होते. त्याबद्दल सातव यांनीं मुलाला विचारणा केली. त्यावेळी त्यांनी त्याचे फोटोही काढले. तेव्हा क्लास टिचरने त्याचे हात बांधले असल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांनी त्याच्या हाताची सुतळी सोडून त्याला वर्गात पाठवले. काही वेळाने पुन्हा त्यांनी दुसरीच्या वर्गात जाऊन पाहिले.

तेव्हा त्याचे हात पुन्हा बांधलेले होते. त्यांनी याबाबत शिक्षिकेला विचारणा केल्यावर तिने प्रिन्सीपल मॅडमने सांगितल्यामुळे त्याचे हात बांधल्याचे सांगितले. सातव यांनी प्रिन्सीपल प्रज्ञा गोखले यांच्याकडे त्याचे हात बांधण्याबाबत विचारणा केल्यावर तो जास्त त्रास देत असल्याने त्याचे हात बांधल्याचे सांगून याची वाच्यता कुठेही न करण्याचे सातव यांना सांगितले. परंतु काही दिवसांनी त्यांना शाळेने कोणतेही कारण न देता नोकरीवरून काढल्याचे पत्र दिले. त्यानंतर सातव यांनी याबद्दल ५ फेब्रुवारी रोजी थेट महिला व बालकल्याण मंत्रालयाला फोटोसह इमेल केला.

महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून यासंदर्भात पुणे पोलिसांना ई मेल करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. याप्रकरणी कोंढवा पोलीस व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली. त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात क्लास टिचर हबीबा व प्रिन्सीपल प्रज्ञा गोखले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाडकर यांनी दिली.