भवानी पेठेत फायबरच्या कारखान्याला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भवानी पेठेतील फायबरच्या कारखान्याला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. त्यात संपूर्ण कारखान्यातील साहित्य जळून खाक झाले. फायबरचे सर्व साहित्य असल्याने आगीने पटकन पेट घेतला. त्याच्या ज्वाळा लांबवरुन दिसून येत असल्याने या परिसरात एकच गोंधळ उडाला होता. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आले.

भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ हा रबर आणि प्लॉस्टिक मोडिंगचा छोटा कारखाना आहे. या कारखान्याला आग लागल्याची खबर अग्निशामक दलाला सायंकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी मिळाली. मध्य वस्तीतील गजबजलेला परिसर लक्षात घेऊन या ठिकाणी तातडीने १० बंब आणि ३ टॅकर तातडीने रवाना करण्यात आले.

अग्नीशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांच्यासह प्रमुख अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी कर्मचाऱ्याच्या सहकार्याने ही आग दीड तासाच्या प्रयत्नांनंतर विझविण्यात यश मिळविले. या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.