डॉक्टर ने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीवर दवाखान्यामध्येच नराधम डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. ही मुलगी दवाखान्यात काम करत होती. संतापजनक बाब म्हणजे दवाखान्याच्या बाजूला असलेल्या मेडिकल दुकानदाराने या दुष्कृत्याचा व्हिडीओ तयार करत तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीने याबाबत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी डॉ. ताज अन्सारी व मेडिकलचालक दिलदार शेखविरोधात गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे. मेडिकलवाला फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीसांच्या तपासात हा डॉक्टर बोगस असल्याचेही उघडक झाले आहे.

कल्याण पूर्वमधील तिवली परिसरात ताज अन्सारी याचे हसन क्लिनिक सेंटर आहे. दवाखान्याच्याच बाजूला दिलदार शेख याचे मेडिकलचे दुकान आहे. या दवाखान्यात पीडित अल्पवयीन मुलगी काम करत होती. मुलीची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा फायदा घेत ताजने तिच्याशी अनेकदा लगट करण्याचा प्रयत्न करत कामावरून काढून टाकण्याची धमकी देत काही महिन्यांपूर्वी तिच्यावर दवाखान्यातच लैंगिक अत्यचार केला. याबाबत कुठे वाच्यता केल्यास कामावरून काढून टाकत बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर धमक्या देत तो वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

दरम्यान, शेजारच्या मेडिकल दुकानाचा चालक दिलदार शेख यास याची कुणकुण लागताच त्यानेही पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत डॉक्टरच्या दुष्कृत्याचा व्हिडियो तयार केला. तसेच, मुलीला बदनाम करण्याची धमकी देत त्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अखेर घाबरलेल्या पीडितेने कुटुंबाला हा प्रकार सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी ताज अन्सारी व मेडिकलदुकानाचा चालक दिलदार शेखविरोधात गुन्हा दाखल करत ताज अन्सारी याला अटक केली.