अबू आझमी यांची कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बंद दाराआड चर्चा 

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी हे धुळे येथे महापालिका प्रचारदौऱ्यासाठी आले होते. त्याची जाहिर सभाही शहरात पार पडली. दरम्यान, महापालिका निवडणुक प्रचारसाठी आलेल्या आझमी यांनी येथील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बंद दराआड चर्चा केली. या भेटीची चर्चा सध्या धुळ्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आ. अबू आझमी यांनी धुळे महापालिकेच्या या भेटीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली की, आगामी निवडणुकांचीही पेरणी करून ठेवली, याबाबत अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान, महालिका निवडणूक प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत आ. अबू आझमी यांनी महापालिका निवडणुकांमध्ये जातीयवादी शक्तींना दूर ठेवा, असे आवाहन धुळेकरांना केले. ही सभा शहरातील वडजाईरोड परिसरात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पक्षाचे प्रदेश महासचिव जुल्फेकार आजमी, अब्दूल रऊफ, अकिल अन्सारी, अलमगीर शेख, नगरसेवक अमिन पटेल, जमिल मन्सुरी, इनाम सिद्दिकी, गुलाम कुरेशी, अकील शाह, इरफान शाह, नविद अख्तर, नवाब पठाण, जाकीर खान, इद्रिस शेख, गुड्डू काकर, सीमा चव्हाण आदी उपस्थित होते. आ. आझमी यांनी सभेत राज्य व केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली.

आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिकावर लुटमारीचा गुन्हा

जळगाव : आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सी. एस. इंगळे याच्यासह दोन अज्ञात व्यक्तींविरूद्ध जबरी लुटीचा गुन्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सी. एस. इंगळे हे वरिष्ठ लिपिक असून ते मुख्य पोस्ट करवसुली अधिकारी आहेत. परंतु आरटीओच्या आशीर्वादाने वरिष्ठ लिपिक या पदावर ते काम करीत आहेत. रात्रीच्या वेळी एक गाडी आडवून तिच्यातीली इसमाची चैन जबरदस्तीने पळविल्यासंबंधी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरणाड, ता. मुक्ताईनगर येथील दिलीप पाटील हे रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाने पुरणाड येथून जळगावकडे घरी येत असताना यादव धाब्याजवळ पाठीमागुन कोठडी गावाकडून स्विफ्ट डिझायर कार आली. या कारने दिलीप पाटील यांची गाडी थांबवली. त्यानंतर स्विफ्ट डिझायर कारमध्ये सी. एस. इंगळे (जळगाव) व दोन अनोळखी इसम हे उतरले आणि गाडीजवळ येवून सी. एस. इंगळे यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करून् मारहाण केली. पाटील यांना गाडीतून बाहेर काढून त्यांची सुमारे ३२ हजार रूपये किंमतीची १० ग्रॅस सोन्याची चैन ओढून तिघेही पसार झाले, असे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी. एस. इंगळेसह दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. अशोक कडलग हे करीत आहेत.