मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला भरधाव बसने चिरडले

अहमदपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला एका भरधाव वेगात जाणाऱ्या बसची धडक बसली. बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील मोरेवाडी येथे झाला.

ओमसाईल भाऊराव जाधव (वय-१८ रा. मोरेवाडी, ता. अहमदपूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बस चालक आंबादास गोविंद गुंजुटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनंत जाधव यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ओमसाईल जाधव हा आज सकाळी साडेपाचच्या सुमारास दिपक कानवटे, दिनेश मोरे, गणपत राकिले सोबत मॉर्निंग वॉकला गेला होता. हे सर्वजण मोरेवाडी पाटीवर नांदेड बिदर राज्य मार्गावर रनिंग करत होते.

यावेळी सकाळी साडेसहाच्या सुमारास बसने (एम.एच.२० डि.९५२७) ओमसाईला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ओमसाईलला जास्त मार लागल्‍याने तो जखमी झाला. मात्र या घटनेनंतर बस चालक आंबादास गोविंद गुंजुटे याने बस न थांबवता तेथुन पळून गेला.
ओमसाईल सोबत असलेल्या दिपक कानवटे याने या अपघाताची माहिती जाधव याच्या घरच्यांना देवून त्याला एका ॲटो चालकाच्या मदतीने अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्‍याला तपासून मृत घोषीत केले. अनंत जाधव यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी बस चालक आंबादास गोविंद गुंजुटे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.