तिला मिळाला ‘आधार’चा खरा आधार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील सर्व नागरिकांना एकच क्रमांक देण्यात यावा आणि देशात कुठेही त्याला स्वतःची ओळख देता यावी म्हणून शासनाने फेब्रुवारी २००९ मध्ये आधार कार्ड योजनेची संकल्पना तयार केली. हेच अधारकार्ड सक्तीमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र याच आधार कार्डमुळं एका हरवलेल्या गतिमंद मुलीला तीन वर्षांनी तिचे कुटुंब परत मिळाले. सदर मुलगी तीन वर्षांपासून धुळ्यातील संस्कार बालगृहात राहात होती. आधार कार्डमूळ ती झारखंड येथे निवासस्थानी परतली असून बुधवारी गीताला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.

अहमदाबाद – हावडा एक्स्प्रेसमध्ये १३ जुलै २०१५ रोजी एका प्रवाशाला एक गतिमंद मुलगी मिळाली होती. जळगाव येथील एका संस्थेच्या मदतीने तिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. त्यावेळी तिने स्वत:चे नाव गीता किशन असे सांगितले होते. यानंतर बालकल्याण समितीमार्फत गीताला १४ जुलै रोजी धुळे शहरातील संस्कार बालगृहात दाखल करण्यात आले. गीताला मराठी भाषा व्यवस्थित कळत नव्हती. यामुळे तिची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत होत्या. वैद्यकीय तपासणीतही ती गतिमंद असल्याचे उघड झाल्याने बालगृहातील सदस्यांपुढे समस्या उभी राहिली. अखेर तिचे आधार कार्ड काढलेले असेल तर त्याची माहिती मिळवण्याचा निर्णय झाला. तिच्या हाताच्या अंगठ्यांचा ठसा त्यासाठी महत्वपूर्ण ठरला.

आधार कार्डची प्रत काढण्यात आली. त्यात तिचे मूळ नाव सुशीला पिंगुवा क्रिश्ना चंपिला असे आले. ती मूळची झारखंडमधील कुमारडुंगी, पश्चिमी सिंहभूम येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. यानंतर संस्कार बालगृहाचे संचालक सुनील वाघ यांनी पोलिसांच्या मदतीने झारखंड पोलिसांशी संपर्क साधला.  पोलिसांच्या मदतीने बुधवारी गीताला तिच्या भावाच्या आणि झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आधार कार्डवर असणाऱ्या फिंगर प्रिंट आणि आय सेन्सिंगमुळे आतापर्यंत घरापासून ताटातूट झालेल्या काही लहान मुलांना त्यांच्या स्वगृही परतण्यासाठी मदत झालेली आहे.