१९ वर्षांनंतर आमिरचा भाऊ पुन्हा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण 

मुंबई :वृत्तसंस्था – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान १९ वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होता.२००० साली ‘मेला’ चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. परंतु तो लवकरच ‘फॅक्ट्री’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात फैजल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. एवढेच नाही तर या चित्रपटातून तो सिंगर म्हणूनही डेब्यू करतोय.
बाल कलाकार म्हणून फैजलने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आमिरच्या ‘कयामत से कयामत’ तक चित्रपटात तो छोट्याशा भूमिकेत झळकला.यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल आमिरसोबत दिसला होता. याच चित्रपटातून त्याला ओळख मिळाली पण हा चित्रपट फ्लॉप झाला.
‘फॅक्ट्री’ माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटासाठी मला एक गाणे गाण्यासाठी विचारण्यात आले आणि मला धक्का बसला. कारण मला गाण्याबद्दल काहीही ठाऊक नाही. पण माझा आवाज या गाण्याला साजेसा आहे, असे मला शारिकने सांगितले आणि मी प्रयत्न केला. हा प्रयत्न सोपा नव्हता. पण मी फायनल गाणे ऐकले आणि मला स्वत:च स्वत:चा अभिमान वाटला, असे फैजलने सांगितले.
शारिक मिन्हाज या चित्रपटाचे डायरेक्टर असून  फैजलने त्यांच्या सोबत दोन चित्रपट केले आहेत. पहिला म्हणजे, ‘चांद बुझ गया’ आणि दुसरा म्हणजे ‘चिनार ए दास्तान’. आता शारिकच्याच ‘फॅक्ट्री’ मध्ये फैजलची वर्णी लागली आहे. साहजिकच फैजल जाम उत्सूक आहे.