‘अभाविप’ कार्यकर्त्यांची नागपुरात गुंडागर्दी : महिला कर्मचाऱ्यांना ही धक्काबुकी 

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची अरेरावी नागपुरात समोर आली आहे. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड तोडफोड केली. निकाल वेळेवर लावावा तसेच विविध विषयांवरील मागण्यांचे निवेदन देण्यासाठी नागपूर विद्यापीठात गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. “लोखंडी चॅनेलगेट’ तोडले, तसेच कुलसचिवांच्या काचाही फोडल्या. ही घटना शुक्रवारी (ता.8) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात घडली. यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरात नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांसोबत धक्काबुक्कीही केली. त्यात दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.

निवेदन देण्यासाठी काल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 30 ते 40 कार्यकर्ते विद्यापीठात दाखल झाले होते. कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या केबिनमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा बलाच्या जवानांनी त्यांना रोखलं असता त्यांनी धुडघूस घालायला सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी कुलसचिवांच्या कॅबिनच्या काचा फोडल्या. यावेळी सुरक्षा बलाचे जवान योगेश गांगुर्डे यांच्या अंगावर गेट पडल्याने ते जखमी झाले. तर महिला कार्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करत असताना महिला रक्षकाच्या हाताला दुखापत झाली.

विद्यार्थ्यांना मारु नका असा वरिष्ठांचा आदेश असल्याने आम्ही कारवाई केली नाही, असं सुरक्षाबलाचे जवान म्हणाले. पण एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यार्थी नव्हते. एबीव्हीपीची विद्यापीठात गोंधळ घालण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही तीन वेळेस यांच्याकडून गोंधळ घालण्यात आला, अशी माहिती सुरक्षा बलाच्या जवानांनी दिली.

विद्यापीठात अभाविपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीनंतर पोलिसांना बोलवून करुन घडल्या प्रकारची माहिती देणे आवश्यक होते. मात्र, यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्रभारी कुलसचिव यांचेसह अधिकारी मुख्य कार्यालयातून गायब झालेत. त्यांना संपर्क केला असता, त्यांनी व्यस्त असल्याचे कळविले. डॉ. खटी यांनी कारवाई करु असे सांगून अधिक बोलण्यास टाळले. एकूणच विद्यापीठ प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात तोडफोड केल्यानंतर त्यांच्यावरही राजकीय दबावापोटी कारवाई झाली नव्हती हे विशेष.