२६ हजाराची लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी २६ हजार रुपयांची लाच स्विकारताना भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकुनासह एका खासगी इसमाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (मंगळवार) तहसील कार्यालयात करण्यात आली.

पुरवठा हिशोब अव्वल कारकुन प्रफुल्ल पांडुरंग कांबळे, वय-३९), खासगी इसम रहीम मोहम्मद गवळी (वय-५६) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५२ वर्षीय इसमाने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांचे स्वस्त धान्याचे दुकान आहे.

त्यांच्याकडे असलेल्या  रेशन धारकांचे रेशनकार्ड हे शासनाच्या नवीन धोरणानुसार प्रत्येकाचे रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक असल्याने, प्रत्येकी ७०० रुपये प्रमाणे ७३ रेशनकार्ड आधारकार्डशी लींक करण्याच्या मोबादल्यात कांबळे याने खासगी इसमामार्फत लाच मागितली. कांबळे याने खासगी इसमामार्फत ५१ हजार १०० रुपयांची लाच मागितली.

याची तक्रार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. कांबळे याने तक्रारदार यांचेकडे ९ जानेवारी व १५ जानेवारी रोजी लाच मागितल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. ठरलेल्या ५१ हजार १०० रुपयांपैकी २६ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना कांबळे आणि खासगी इसमास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उप अधिक्षक जी.एम. ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, अरुण पाटील, नासीर देखमुख, ईश्वरी धनगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.