५ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापकासह लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या ताब्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन- सेवा पुस्तकाची प्रत व इतर कागदपत्रे देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक आणि लिपिकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) सायंकाळी मुंदडा शाळेत करण्यात आली. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी मुलांवर चांगले संस्कार करण्यात येतात त्याच सरस्वतीच्या मंदीरात असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पी.एम.मुंदडे विद्यालयाचा मुख्याध्यापक भरत धुडकू पाटील ( ५७, रा. शिवराणा नगर, जळगाव) व लिपीक संजय श्रीकृष्ण कुळकर्णी ( ५१, रा. मंगलमूर्ती नगर, पिंप्राळा) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी एका महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार महिला ही  पिंप्राळा परिसरातील पी.एम.मुंदडे विद्यालयात कार्यरत आहे.  त्यांची आता तेथून लुंकड विद्यालयात बदली झाली आहे. नोकरीबाबतचे सेवापुस्तक व इतर कागदपत्रांची फाईल मुख्याध्यापक पाटील व लिपीक  कुळकर्णी यांच्याकडे होती. ही कागदपत्रे देण्यासाठी वरील दोघांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने याची पडताळणी पंचासमक्ष केली. त्यांनंतर आज सायंकाळी शाळेमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.