१ हजाराची लाच घेणारा पोलीस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – दाखल गुन्ह्यात जामीन व कठोर कारवाई न करण्यासाठी १ हजाराची लाच तक्रारदारांकडून घेताना वेदांतनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई योगेश पंडीत सुर्यवंशी (वय- २७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.१६) दुपारी करण्यात आली. याप्रकरणी ३५ वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांच्या भावावर औरंगाबाद येथील वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास योगेश सुर्यवंशी करीत आहेत. या गुन्ह्यामध्ये जामीनावर सोडवण्यासाठी मदत करण्यासाठी तसेच कठोर कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी सुर्यवंशी यांनी केली. तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार आज पोलीस शिपाई सुर्यवंशी यांच्या लाचेची पडताळणी करण्यात आली. त्यावरून पोलीस ठाण्यात लाचेचा सापळा लावला. त्यावेळी तक्रारदाराकडून १ हजार रुपयाची लाच घेताना पोलीस शिपाई योगेश सुर्यवंशी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
हि कारवाई औरंगाबात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे आणि त्यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांक किंवा ७८७५३३३३३३ या व्हॉट्स अॅप नंबरवर संपर्क साधावा.