१ कोटी लाच प्रकरण : तहसीलदाराचे लॉकर सील ; घराचीही झाडाझडती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुळशीच्या तहसीलदाराला १ कोटीची लाच घेताना रंगेहाथ पकडून आपली २०० वी यशस्वी सापळा कारवाई केली. हे एक कोटीचे लाच प्रकरण राज्यभरात गाजत असताना तहसीलदार सचिन डोंगरे यांचे बँक लॉकर सील करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. एवढेच नाही तर त्याच्या घराची देखील झाडाझडती देखील घेण्यात आली आहे. या तपासणीनंतर लाचलुचपत विभागाच्या हाती नेमके काय लागले याची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

नेमके काय आहे प्रकरण 
वारस नोंदी प्रकरणात निकालपत्र देण्यासाठी मुळशी तहसिलदार सचीन महादेव डोंगरे (वय-४३ रा. लेझी रॉक सोसायटी, रो. हाऊस नं. ३ बावधन, पुणे) यांना १ कोटीची लाच स्विकारताना अॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवार दिनांक  २९ डिसेंबर २०१८ उरवडे गावच्या हद्दीत लव्हासा रोडवरील घोटवडे फाटयापासुन ३ किमी अंतरावरील रोडवर सापळा रचून करण्यात आली. या प्रकरणी ६३ वर्षीय इसमाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लवळे येथील वडिलोपार्जित असलेली सामाईक जमीन वर्ग करण्यासाठी डोंगरे याने तब्बल १ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. एका मध्यस्थाच्या माध्यमातून लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २ जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच स्वीकारल्यामुळे सचिन डोंगरे याच्याकडून मोठे घबाड लागण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता लाचलुचपत विभागाने त्याचे मूळ गाव असलेल्या मोहोळ तालुक्यातील पापरी येथील घराची झाडाझडती घेतली. तसेच मोहोळ शहरातील बंगल्याचीसुद्धा तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. डोंगरीच्या घराची आणि बंगल्याची झाडाझडती घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ येथील बँक ऑफ इंडियाच्या लॉकरची तपासणी केली. यावेळी तहसीलदार डोंगरे याचे बँक ऑफ इंडियाच्या शाखेत लॉकर असून या लॉकरची तपासणी केली. त्यानंतर ते सील करण्यात आले. दरम्यान, या चौकशीत लाचलुचपत विभागाच्या हाती काय लागले आहे, याची माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.