शिवसेना नेत्याच्या अपघाती मृत्युमुळे महाडला खळबळ

महाड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश कालगुडे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना महाड औद्योगिक वसाहतीतील झुआरी फर्टिलायझर्स कारखान्याजवळ मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. मात्र हा घातपात असल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला आहे. ट्रेलर चालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून कालगुडे यांची हत्या झाल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवसैनिकांनी एकच गर्दी केली असून हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप संप्तत झालेल्या शिवसैनिकांकडून केला जात आहे. यामुळे संपूर्ण महाड शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली.

महाड औद्योगिक पोलीस ठाणे, कारखाना आणि शासकीय रुग्णालय या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीच तक्रार दाखल झाली नसून संबंधित कंटेनर चालक शिवपती सुभोगलाल पटेलला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुरेश कालगुडे यांचे महाड एमआयडीसी भागात असलेल्या झुआरी फर्टिलायझर्स या कारखान्यात जेसीबीचं कंत्राट होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कंपनीतील जेसीबी चालक आणि ट्रेलर चालक या दोघांमध्ये गाडीवरुन वाद झाला. या घटनेची माहिती जेसीबी चालकाने कालगुडे यांना दिल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कालगुडे आणि ट्रेलरचालक यांच्यामध्ये वाद झाला.

या वादानंतर कालगुडेंचा ट्रेलरला धडकून अपघाती मृत्यू झाला. मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर कालगुडे यांच्या मृत्यूबद्दल शिवसैनिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर महाड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कालगुडे यांच्या मृत्यूनंतर आज बिरवाडी आणि महाड बाजारपेठ बंदची हाक शिवसेनेने दिली आहे.

भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध : ठाकरे