बोरांच्या वाटणीवरुन भांडण ; करदोड्यानं गळा आवळून जिगरी मित्राचा खुन

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – बोरांच्या वाटणीवरून मित्राचा खुन करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांनी हा निकाल दिला.

अविनाश दत्ता चव्हाण (२०) रा. बोथवन ता. उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. सावन प्रेम राठोड (१३) असे मृतकाचे नाव आहे. मृतक, आरोपी व त्याचे चार मित्र बोथवन येथे शेतात गेले होते. बोराच्या झाडावर चढून बोरं पाडून जमा केली. यावेळी त्या दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, आरोपीने करदोड्याने गळा आवळून सावन राठोडचा खुन केला. तसेच माचिसच्या काडीचे चटके देऊन तो जिवंत आहे का, हे बघितले.

ही घटना रूपेश चव्हाण व नितीन रणमले यांनी बघितली होती. त्यांनी मृतकाच्या वडिलाला याबाबत माहिती दिली. मृतकाचे वडील प्रेम बद्दू राठोड यांनी पोफाळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासले. यामध्ये दोष सिद्ध झाल्याने आरोपी अविनाश चव्हाणला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. मनोज काळेश्वर यांनी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून दिलीप राठोड यांनी काम पाहिले.