डी-मोरया गँगमधील माजी नगरसेवकासह आठजणांवर  मोकाअंतर्गत कारवाई

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन – खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने सांगलीतील हनुमाननगर येथील डी-मोरया गँगमधील आठजणांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक राजू लक्ष्मण गवळी (वय 50, रा. हनुमाननगर) याचाही समावेश आहे. दरम्यान या गँगवरील मोक्याच्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी परवानगी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
 माजी नगरसेवक राजू गवळीसह गँगचा म्होरक्या धनंजय संजय गवळी (22), सचिन उर्फ संतोष संजय गवळी (20, दोघे रा. हनुमाननगर), पंकज चन्नाप्पा वाघमारे (21), आदर्श रमेश मोहिते (21, दोघे रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी), गणेश परगोंडा हात्तीकर (28, विठ्ठलनगर), प्रशांत संजय गवळी (25, हनुमाननगर), राहूल (पूर्ण नाव नाही) या सर्वांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
माजी नगरसेवक राजू गवळी याचा पुतण्या धनंजय गवळी हनुमाननगर परिसरात असणार्‍या डी-मोरया गँगचा प्रमुख आहे. या टोळीने शहरातील वारणाली, शंभफुटी रस्ता, हनुमाननगर, गुलमोहर कॉलनी, जुना धामणी रोड अशा विविध ठिकाणी दहशत माजवली होती. यातील टोळीतील अनेकांवर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी यासारखे सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दि. 21 ऑगस्ट रोजी पूर्ववैमनस्यातून धनंजय गवळीसह त्याच्या साथीदारांनी गुंड गणेश बसाप्पा माळगे (वय 28) याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला होता.
धनंजय गवळी आणि गणेश माळगे यांच्यात पूर्वीचा वाद होता. माळगे याने धनंजयवर खुनीहल्ला केला होता. त्या गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आल्यानंतर तो हनुमाननगर येथे माजी नगरसेवक राजू गवळी यांना भेटायला गेला होता. तेथून बाहेर पडल्यानंतर धनंजय गवळीसह त्याच्या साथीदारांनी त्याा पाठलाग करून खून केला होता. त्यानंतर यातील सर्व संशयितांना पोलिसांनी अटक केली. तर खुनाचा कट रचल्याप्रकरणी माजी नगरसेवक राजू गवळी यांनाही अटक करण्यात आली होती. यातील सर्व संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
या डी-मोरया गँगची दहशत मोडीत काढण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी या टोळीविरोधात मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. अधिक्षक शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे,  सिद्धाप्पा रूपनर, विशाल भिसे यांचा कारवाईत सहभाग होता.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई
माजी नगरसेवक राजू गवळीसह डी-मोरया गँगच्या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अधिक्षक शर्मा यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी बनवण्याच्या सूचना सर्व प्रभारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार त्यांची यादी बनवण्यात आली असून या महिन्यात होणार्‍या गुन्हे आढावा बैठकीत अधिक्षक शर्मा त्याची माहिती घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारी टोळ्या आणि गुंडांवर मोका, स्थानबद्धता, हद्दपारी आदी कारवाया करण्याचे संकेत अधिक्षक शर्मा यांनी दिले आहेत.