सोलापुरात तब्बल ४८ जणावर होणार तडीपारची कारवाई

सोलापूर : पोलीसनामा आॅनलाइन – अक्कलकोट येथे चोरी, वाळू चोरी, अवैध दारू, जुगार, मटका, हत्याराने मारहाण व गँग, टोळी अशा प्रकारचे कृत्य केल्याने दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींवर तडीपारची कारवाई करण्यात येणार आहे. यातील ४८ जणांवर या कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली. यामुळे सुमारे तीनशे जणांच्या डोक्यावर तडीपारीची टांगती तलवार आहे.

आजतागायत शहरांमध्ये लोकवर्गणीतून बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीकर संभाषणाद्वारे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न उत्तर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत होता. अलीकडच्या काळात पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर समाजात घातक प्रवृत्तीवर आळा घालण्याच्या उद्देशाने आपले कार्य चालू केले. यामध्ये अक्कलकोट शहरासह ५२ गावे उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. या गावांमध्ये दारू, जुगार, वाळू चोर, मटका, मारामारी, टोळ्या व टवाळखोरी या प्रकारच्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींवर तडीपारची कारवाई करण्याचे काम हाती घेतले असून यामध्ये सुमारे तीनशे व्यक्तींचा समावेश करण्यात आला असल्याचे समजते. यातील सुमारे ४८ व्यक्तीवर तडीपार कारवाईची प्रक्रिया चालू असल्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. या कारवाईमुळे शहरासह हद्दीतील गावात गुन्हेगारीवर मोठा आळा बसेल, असे पो.नि. निंबाळकर म्हणाले.
पो.नि. भगवानराव निंबाळकर म्हणाले, अशा प्रकारची कारवाई दौंड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना मी केली असून, तडीपार केलेल्या व्यक्तींचे डिजिटल बोर्ड तयार करून शहरातील प्रमुख चौकांमध्ये देखील लावले होते. याकरिता अशा प्रकारचा एखाद्या देखील गुन्हा ज्या व्यक्तीने केला असेल त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल होऊ नये याची खबरदारी घेऊन समाजात वावरावे. अशा प्रकारचे गुन्हे वारंवार एखाद्या व्यक्तीवर वाढत गेल्यास त्यांच्यावर तडीपार, मोक्का, एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात येईल.