एफटीआयआय’चे नवे अध्यक्ष गुलशन ग्रोवर ? 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाची जागा सध्या रिक्त आहे. या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यापूर्वी यापदी जेष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी बॉलिवूडमधील ‘बॅड मॅन’ अभिनेते गुलशन ग्रोवर यांच्या नावाची या पदासाठी चर्चा आहे.

गुलशन ग्रोवर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेते आहेत. तब्बल ४००हून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. सिनेसृष्टीत येण्याआधी ते अध्यापनाच्या क्षेत्रात होते. संजय दत्त, विजया पंडित, सनी देवल, कुमार गौरव आणि टीना मुनीम यांना गुलशन ग्रोवर यांनी अभिनयाचं प्रशिक्षण दिलं आहे. ‘राम लखन’मधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवल्यानंतर त्यांनी रोशन तनेजांकडे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं होतं.

अनुपम खेर यांचा राजीनामा
एका कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी न्यू अॅमस्टरडॅम इथं जावं लागल्यानं अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आपल्या जबाबदारीकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून खेर यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध सुरू होता. हा शोध गुलशन ग्रोवर यांच्यापाशी येऊन थांबल्याचं समजतं. मात्र, गुलशन ग्रोवर यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.’