मुळशी पॅटर्न च्या घवघवीत यशा नंतर तरडेंचा येतोय हा नवा पॅटर्न 

पुणे ; पोलीसनामा ऑनलाईन: दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘ मुळशी पॅटर्न ‘ या चित्रपटावर सुरुवातीला बरीच टिका टिप्पणी झाली आहे. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांनी चित्रपटाला डोक्यावर घेतलं. राज्यभरात ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे . शेतकरी, गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यावर आधारलेला कुटुंबासोबत  पाहता येईल असा चित्रपट प्रवीण तरडे प्रेक्षकांसाठी घेऊन आले. हा चित्रपट, त्याचे कथानक,संवाद यांसोबतच आणखी एका गोष्टीने लोकांची मनं जिंकली आहे ती म्हणजे प्रवीण तरडे यांची बेधडक वक्तव्यं आणि त्यांचे विचार. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, विकासांचे पर्याय शोधताना शेतकऱ्यांचा न केलेला विचार, तहसीलदारांवर होणारे हल्ले यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात आपल्या चित्रपटांतून सामाजिक मुद्द्यांना अधोरेखित करणार असल्याचं सांगतानाच ‘मुळशी पॅटर्न’नंतर आता ‘रेती पॅटर्न’ घेऊन येणार असं प्रवीण तरडे म्हणाले.
‘देशाचा विकास करताना आपण शेतकऱ्यांचा विचारच करत नाही ही आपली खरी समस्या आहे. माझा चित्रपट हा शेतकऱ्यांना सदन करेल. शेती ही विकायची नसते जपायची असते असे संवाद यामध्ये आहेत. शेतकऱ्यांची मुलंबाळं यांनी  पोलीस, जिल्हाधिकारी अशा पदांवर काम केलं पाहिजे. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी मुळशीचा आहे आणि तिथल्या गुन्हेगारीचा प्रश्न मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. आजपर्यंत आपण केवळ आत्महत्या हा शेतकऱ्यांचा प्रश्न असल्याचं दाखवलं आहे. आत्महत्या हे शेतकऱ्याने अनेक प्रश्नांवर काढलेलं उत्तर आहे आणि तोच तुम्ही प्रश्न म्हणून मांडत आहात. त्यांचे मूळ प्रश्न लांबच राहिले आहेत,’ असा संताप त्यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवला
यावेळी त्यांनी वाळू तस्करी आणि तहसीलदारांवर होणाऱ्या हल्ल्यांचाही प्रश्न उपस्थित केला. ‘पुढचा चित्रपट हा रेती पॅटर्न असेल. अशा प्रश्नांना मी वाचा फोडत राहणार,’ असं ते म्हणाले. प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अभिनेता सलमान खान त्याचा हिंदी रिमेक आणणार असल्याचीही माहिती आहे.सलमान खान स्वतः मराठी चित्रपट निर्मिती सुरु करत आहे तो मराठी चित्रपटाच्या हक्कांसंबंधित त्याच्या निर्मिती कंपनीचं बोल झालं आहे असं एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून आलं आहे, सलमान ने हाती घेतलेल्या मुळशी पॅटर्न च्या रिमेक साठी आयुष शर्मा प्रमुख भूमिकेत असणार आहे २०१९ मध्ये रिमेक च्या चित्रकरणाची सुरुवात होणार आहे.
मुळशी पॅटर्न या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, नाळ अशा मराठी चित्रपटांचं आव्हान समोर असताना या चित्रपटानं १३ कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता बघण्याची उत्सुकता ही असेल की  सलमान बनवणार तो रिमेक प्रेक्षक पसंत करतात की  नाही