‘टोटल धमाल’ प्रमाणेच ‘हे’ दोन चित्रपट सुद्धा पाकिस्तानात रिलीज होणार नाही 

मुंबई : वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यामुळे बॉलिवूडमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’ चित्रपट पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय घेतला होता.आता या चित्रपटानंतर आणखीन दोन चित्रपट पाकिस्तानात रिलीज न करण्याचा निर्णय चित्रपटांच्या मेकर्सनी घेतला आहे.

‘टोटल धमाल’ चित्रपटाप्रमाणेच कार्तिक आर्यन व क्रिती सॅननचा ‘लुका छुपी’ आणि सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैया’ हे दोन चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीत. हा निर्णय चित्रपटांच्या मेकर्सने घेतला आहे.

सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैया’ चित्रपट चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट अभिषेक चौबे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर कार्तिक आर्यनचा ‘लुकाछुपी’ रोमँटिक कॉमेडी चित्रपट मडॉक फिल्मची निर्मिती आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच कार्तिक आर्यन आणि  क्रिती सॅनन दिसून येणार आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या भ्याड हल्ल्याची निंदा करत शहीद जवानांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला होता. तसेच या हल्ल्याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईजने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. आणि एवढेच नाहीतर टी-सीरिजनेही पाकिस्तानी गायकांची गाणी युट्युब वरून हटवली आहेत.