राजकीय

आंदोलक मुलींच्या वडिलांसह चौघांची रवानगी तुरुंगात !

दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आंदोलक शेतकरी कन्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी नगरला घेऊन जाताना विरोध करणाऱ्या आंदोलक मुलीच्या वडिलांसह चार जणांना राहाता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. आंदोलक मुलींच्या वडिलांनाच तुरुंगाची हवा खावा लागल्याने पुणतांबा ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये धनंजय भास्करराव जाधव, हेमंत दिगंबर कुलकर्णी, गजेंद्र सर्जेराव जाधव, प्रताप अर्जुनराव वहाडणे (सर्व. रा. पुणतांबा, ता. राहाता) यांचा समावेश आहे. राहाता येथील न्यायालयाने चौघांनाही दहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

पुणतांब्यात शेतकरी कन्यांनी त्यांचे उपोषण मागे घेतले असले, तरी एका आंदोलक मुलीचे वडील व इतर ग्रामस्थांची रवानगी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 (3) प्रमाणे तुरुंगात केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी सदर आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला जाऊ लागला आहे. सदर मुलींना उपचारासाठी दवाखान्यात नेणे आवश्यक असल्याने त्यांना उपचारासाठी नेत असताना चौघांनी पोलिसांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलक मुली घरी गेल्या असल्या, तरी एकीचे वडील मात्र तुरुंगात आहेत.

काय आहे सीआरपीसी 151(3)
कुठलाही व्यक्ती दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा करण्याची शक्यता वाटल्यास त्याला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 151 (3) प्रमाणे ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले जाते. सदर व्यक्तीला काही दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची तरतूद आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button